गड रोहिडा

गड रोहिडा वृक्षारोपण मोहीम

गेल्या वर्षी गडावर वणवा पेटला होता. त्याची झळ गडावरच्या काही झाडांना बसली. इतक्या कष्टाने काही वर्षे जपली जगवलेली झाडे आगीच्या एका लोळाने नष्ट केली. मात्र मध्यंतरात गडावर Thermax शिरवळ, शिवदुर्ग संवर्धन, भोर बाजारवाडी स्थानिक आणि इतर काही संस्था व दुर्गसेवक यांच्या प्रयत्नांनी सोलर पंप पाण्याची टाकी, ठिबक सिंचन अशी सोय करण्यात आली.

यामुळे या वेळी “गडावर थोडी वाढ झालेली झाडे लावू” असा विचार पुढे आला. श्री शिवदुर्ग संवर्धन आणि लोकवर्गणी यांचे आर्थिक पाठबळ, आणि वर उल्लेख झालेल्या दुर्गसेवकांच्या कष्टाने २०० झाडे विकत घेतली आणि गड पायथ्याला पोच केली.

दुर्दैवाने मोहिमेच्या दोनच दिवस आधी म्हणजे गुरुवारी रात्री गडावर पुन्हा वणवा पेटला होता. ही वार्ता मिळताच रात्री आठ वाजता गडपाल शंकर धावले, वान खात्याचे गुत्ते साहेब, मिसाळ साहेब, थरमॅक्स शिरवळ चे सचिन पाटील, राजेंद्र मर्गजे यांनी गडावर धाव घेतली! या सर्वांनी वणवा विझेपर्यंत गडावर लक्ष ठेवले आणि सुदैवाने सर्वांच्या उपस्थितीमुळे गडावर काही नुकसान झाले नाही.

३० झाडे शनिवारी ३० एप्रिल रोजी मंगेश कुंभार आणि त्यांच्या मित्रांनी गडावर नेली. पहाटे लवकरच त्यांनी झाडे लावायची पूर्वतयारी सुरू केली.

४० झाडे दुसऱ्या दिवशी रविवारी सारथी सोवेनीर काही सोसायटीचे रहिवाशी (ज्यांनी क्रिकेट स्पर्धेत मिळालेल्या बक्षीस रकमेतून पंधरा हजार रुपये काही दिवस आधीच रोहिडा गड साठी दिले) आणि मंगेश कुंभार यांचे आणखी ७ मित्र अशा सर्वांनी गडावर नेली. झाडे लावून त्यांना भरपूर खतपाणी घातले. मंगेश कुंभार ( ज्यांनी त्यांचे गाव लोहगाव पुणे येथे एक खडकाळ टेकडी अखंड प्रयत्नांनी हिरवीगार करून दाखवली आहे ) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याने कामे पटापट निर्विघ्न पार पडली.

गडपाल शंकर धावले यांनी वैयक्तिक व्याप सांभाळत धावपळ करत गडावर ३० लोकांचे जेवण आणले आणि भाजी भाकरी, कांदा चटणी आणि अप्रतिम घुग्र्या खाऊन आणि गडावरचे नैसर्गिक थंडगार शुद्ध पाणी पिऊन आलेले दुर्ग सेवक तृप्त झाले.

आपापल्या सोयीने सर्वांनी दुपारी गडाचा निरोप घेतला.

आणखी १३० झाडे गड पायथ्याला प्रतीक्षा करत आहेत पुढच्या मोहिमेची जेव्हा त्यांनाही गडावर रूजायची संधी मिळेल.

मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रथमतःच एखाद्या हाउसिंग सोसायटी ने याच (म्हणजे हाउसिंग सोसायटी) नात्याने संवर्धन मोहिमेत भाग घेतला – ते म्हणजे सारथी सोवेनीर! म्हाळुंगे येथील या सोसायटीने आर्थिक योगदान तर दिलेच पण सोबत आज श्रमदान करून एक नवीन पायंडा पाडायचा प्रयत्न केला आहे.

इतर हाउसिंग सोसायटी याचे अनुकरण करतील याची अपेक्षा आहे.

आपली शौर्य मंदिरे म्हणजे गडकोट जपण्यासाठी असेच एकत्र आले पाहिजे.

Leave a comment